मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्यात केंद्रातील भाजपा सरकारचा हात असल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीकडून केले. शिवसेना पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातील सरकार हे राज्यातील सरकार तोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तर काँग्रेस पक्षातील कोणीही भाजपासोबत जाणार नसून, आमचा पक्ष कुत्र्या मांजरांचा नाही तर वाघाचा असल्याचा इशारा, नाना पटोले यांनी दिला. (Nana Patole on BJP) (Nana Patole on INDIA Mumbai Meeting) (Congress on INDIA Meeting Mumbai)
जनसंवाद यात्रेत बोलणार : येत्या ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, गावात जनसंवाद यात्रा सुरू होणार आहे. कोकणात सर्वजण मिळून दौरा करणार आहेत. तसंच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाणार आहे. लोकशाही धोक्यात आणली, व्यवस्थेला संपवण्याचं काम, शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचं काम सरकारनं केलं. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग केला. सत्तेच्या भरवशावर सगळं मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ईडीचे, येड्याचे सरकार येऊन दीड वर्ष झालं. यावर आम्ही जनसंवाद यात्रेत बोलणार, असं नाना पटोले म्हणाले.
आमचा पक्ष वाघाचा : काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक शिंदे गट आणि काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, आमचा पक्ष कुत्रा-मांजरांचा नाही तर वाघाचा आहे. पेपरफुटी, विशिष्ट लोकांना नोकऱ्या, शेतकरी प्रश्न यावर ते बोलत नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलाय. राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांची यांनी दुरवस्था केली. या मुद्द्यांना दुर्लक्षित करून माध्यमांना अशा बातम्या द्यायच्या आणि विषयाला बगल देण्यासाठी अशाप्रकारे बोलले जाते. इतर पक्षात काँग्रेसकडून कोणीही जाणार नसल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
रश्मी शुक्ला प्रकरण : सत्तेच्या भरोशावर ते काहीही करू शकतात. रश्मी शुक्लांवर चौकशी सुरू झाली तेव्हा हे फोन टॅपिंग जाणीवपूर्वक केलं असे गुन्हे दाखल झाले. एकनाथ शिंदेंच्या सरकारात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. मग हे प्रकरण सीबीआयला देण्यात आलं. आता वॉशिंग मशीनमध्ये सगळं धुतलं जातं. आज ना उद्या फाईल उघडणार. ही फाईल भविष्यात आम्ही उघडू. तसेच प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे. सत्तेतील नेतेही सगळं एकीकडे एकत्र नसतात. सत्यजित तांबे यांच्या परत येण्याबाबतचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असेही नाना पटोले म्हणाले.