मुंबई -राज्याच्या विधानासभा रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध पक्षातील दिग्गज नेते पुढे सरसावले आहेत. भाजपची प्रचार मोहिमही शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते अमित शाह, नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात मोठ्या जोमात होत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही प्रचाराच्याबाबतीत सरसावल्याचे पहायला मिळत आहे. राहुल गांधी आणि ज्योतीरादित्य शिंदे यांच्या राज्यात प्रचारसभा होणार आहेत. मात्र, काँग्रेस अजुनही थंड आहे का? काँग्रेसचं सध्या चाललयं काय? प्रचार नियोजन, कलम ३७०, मुलभूत मुद्दे अशा अनेक मुद्द्यावर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने केलेली खास बातचीत.
प्रश्न : निवडणूक प्रचारात भाजप ३७० चा मुद्दा उपस्थित करत असताना, त्या विरोधात आपला पक्ष शेतकरी आत्महत्या, महागाई आदी विषयावर अधिक आक्रमक होताना दिसत नाही. उलट काँग्रेस ३७० मुद्द्याचे खंडन करताना अधिक व्यस्त असल्याचे दिसते, यावर काय सांगाल?
उत्तर :३७० वर खंडन करायचा आमचा प्रश्न नाही. ही निवडणुक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्रातील प्रश्नावर चर्चा चालत आहे. शेतकऱ्यांचे विषय आहेत. महागाई, बेरोजगारी आदी विषयावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. ३७० कलमचा विषय या निवडणुकीत होऊ शकत नाही. आम्ही या सरकारला राज्यातील प्रश्नांची उत्तरे मागतोय, सरकार देत नाही. आणि त्यावर दुर्लक्ष करण्यासाठी ३७० चा विषय पुढे आणला जात आहे. या पाच वर्षात या सरकारने कोणती कामे केली, हे आम्ही त्यांना विचारतो आणि ते मात्र उत्तर द्यायला तयार नाहीत. कारण ते याचे उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणूनच ते असे वेगवेगळे विषय काढत आहेत असं आमचे मत आहे.
प्रश्न : काँग्रेसचा या निवडणुकीत म्हणावा तितका आक्रमकपणा अजूनही दिसत नाही यावर नेमके काय सांगाल?
उत्तर :राज्यात खूप मोठ्या सभा होताना दिसत नसल्या तरी राज्यातील जिल्ह्यामध्ये, तालुक्या-तालुक्यांमध्ये सभा चालू आहेत. प्रचार सुरू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही राज्यातील शेवटच्या जनतेपर्यंत जाऊन पोहोचत आहोत. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या प्रचारात कुठेही आम्ही कमी दिसत नाहीत. थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. त्यावरच आम्ही निवडणुकीत भर दिलेला आहे.
प्रश्न : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राज्यात असताना पंढरपूर आणि अहेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, हे कितपत उचित वाटते, आणि यातून काय मार्ग काढणार आहात?
उत्तर :यामध्ये पंढरपूरचा निर्णय झालेला आहे. आपण ती जागा राष्ट्रवादीला दिलेली आहे. त्याठिकाणी चुकून आमच्या उमेदवाराचा अर्ज राहिला असला तरी शेवटी निर्णय आमचा आहे. राष्ट्रवादी हा आमचा मित्र पक्ष असल्याने त्यांना मतदान करावं असा आम्ही ठरवलं आहे. आणि त्यासाठी आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. इतर ठिकाणी ही तसेच होईल.
प्रश्न : मित्रपक्षांना आघाडीमध्ये सन्मान मिळाला नाही, अशी कुजबूज सुरू आहे. त्यांना जागा देण्यात आल्या होत्या त्यापैकी १४ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेत. त्यामुळे त्यांच्यात आघाडीकडून फसवणूक केली अशी एक भावना निर्माण झाली आहे त्यावर काय सांगाल?