मुंबई :राज्य सरकारच्या चुकीची धोरण आणि देशात वाढणारी महागाई बेरोजगारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासोबतच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या समाज उपयोगी योजनांची स्तुतिही वेळोवेळी केलेली पाहायला मिळाली आहे.
महागाईवरुन सुळेंची सरकावर टीका : सातत्याने वाढणाऱ्या महागाईवर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा थेट केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई संदर्भात त्यांनी एक ट्विट करून सध्याच्या महागाईचा आरसा केंद्र सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात महागाईचे स्वरूप काय असेल असे ट्विट त्यांनी केले आहे. सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक पावले उचलावीत, नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
सामान्याना दिलासा द्या : सध्या महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महागाईतून देशातील जनतेला दिलासा मिळावा यासाठी तात्काळ मोठी पावले केंद्र सरकारने उचलायला हवीत असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. देशातील पेट्रोल, दूध, डाळी, इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले मात्र, तरी देखील त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही.