मुंबई - मंगळवारी (दि. 26 जाने.) दिल्लीत जे घडले ते अशोभानीय असून त्या घटनेचे मी समर्थनही करणार नाही. परंतु जे शेतकरी 60 दिवस दिल्लीच्या वेशीवर येऊन शांततेत आंदोलन करत होते. ते आंदोलन दिल्लीतील राज्यकर्त्यांनी संवेदनशीलपणे लक्षात घेतले असते तर ही वेळ आली नसती आणि काही लोकांनी या मंगळवारच्या आंदोलनात फायदा घेतला नसता, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ पटनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
...म्हणून अण्णासाहेबांना यशवंतराव चव्हणांनी दिली होती लोकसभेची उमेदवारी
अण्णासाहेब शिंदे यांच्या योगदानावर पवार म्हणाले की, त्यांचे कर्तुत्व पाहूनच 1962 साली यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती. थोड्या कालावधीत त्यांनी शेतीसाठी आस्था असलेल्या अनेक सहकाऱ्यांची शक्ती उभी केली होती. आपल्या कर्तृत्वाचा आणि दृष्टीचा एक ठसा उमटवला होता. शेती संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी भर दिला आणि अनेक शेती संदर्भातील संस्थेने उदयाला आल्या. पुसासारख्या संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.