मुबंई- राज्यात जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला आहे, तो यशस्वी होत आहे, असे मत राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून शरद पवार यांची अडीच तासांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखती दरम्यान, विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार उत्तर देत होते.
या मुलाखतीवेळी खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना तुम्ही राज्यात महाविकास आघाडीचा जो प्रयोग केलात. त्या सरकारला सहा महिने होऊन गेले. हा प्रयोग यशस्वी होतोय, असे आपल्याला वाटते का असा प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, नक्की होतोय. हा प्रयोग आणखीन यशस्वी होऊन या प्रयोगाची फळे महाराष्ट्रातील जनतेला, विविध विभागाला मिळताहेत अशी स्थिती आपल्याला नक्कीच बघायला मिळाली असती. पण, कोरोनाचे संकट आले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. गेली काही महिने राज्य प्रशासन, राज्यकर्ते आणि राज्याची संपूर्ण यंत्रणा फक्त कोरोनाविरुद्ध लढण्याच्या या एकाच कामात गुंतलेली आहे. त्यामुळे बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहिले. अशीच दुसरी गोष्टी म्हणजे आताची यंत्रणा नसती तर कोरोनाच्या संकटालासुद्धा इतक्या प्रभावीपणे तोंड देता आले नसते.
कोरोनासारखं मोठे संकट तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळे जण एका विचाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहेत व परिस्थितीला तोंड देत आहेत. लोंकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहताहेत. हे घडू शेकले याचा अर्थ हे एकदिलाने काम सुरू आहे म्हणून यामुळे तिन्ही पक्षांत जराही नाराज नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.