मुंबई - "घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा सात मते आम्ही घेऊ शकलो नाही. आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही. कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे, त्यांची नावे आमच्याकडे आहेत. या निवडणुकीत आम्ही व्यापार केला नाही. ज्यांना पहाटेची सवय आहे त्यांचा पहाटेचा उपक्रम होता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मी माझ्या पक्षाने दिलेल्या 42 मतांवर लढत होतो. त्यातले एक माझे एक मत बाद केले. घोडे बाजारात या घोड्यांमुळे सरकारला कुठलाही धोका होत नाही. घोडे जिथे असतील तिथेही असतील जिथे हरभरे टाकतील तिथे जातात, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिली.
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून निवडणूक -पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "समोरच्याने पैशाची ताकद व केंद्रीय तपास यंत्रणांची ताकद वापरून घोडेबाजार केला. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासली. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नोंद ठाकरे सरकारही घेत आहे. आपण जनतेच्या न्यायालयात आहोत. हा घोडेबाजाराचा मेंडेट असतो. काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते. पण, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला."
संजय पवार यांच्या पराभवाने मुख्यमंत्री व्यथित - "संजय पवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पराभवामुळे मुख्यमंत्रीही व्यतीत झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्षश्रेष्ठी ठेवत असतो.", असे राऊत म्हणाले. तर वसईच्या हितेंद्र ठाकूर यांच्या बाबत बोलताना ते म्हणाले की, "वसईचे हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. देवेंद्र भुयार यांची मदत देखील आम्हाला मिळाली नाहीत."