मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ताधारी भाजपचा दारूण पराभव झाला आहे. कर्नाटकात कॉंग्रेसने 224 पैकी 136 जागांवर विजय मिळवला असून भाजपने 64 जागा जिंकल्या आहेत. जनता दल सेक्यूलरला 20 जागांवर विजय मिळवता आला असून अन्यांना 4 जागा मिळाल्या आहेत. या निकालावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'हा मोदी आणि शहा यांचा पराभव आहे' :पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'बजरंग बलीची गदा भाजपवर पडली आहे'. राऊत म्हणाले की, 'हा मोदी आणि शहा यांचा पराभव आहे. कर्नाटकात जे काही घडले आहे तेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. कर्नाटक निवडणुकीचे निकाल पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सूचक आहेत, असे राऊत म्हणाले. कर्नाटकात स्टार प्रचारक, मोदी, शाह तसेच केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ नेत्यांची फळी प्रचारात उतरवूनही भाजपचा पराभव झाला असल्याचे संजय राऊत म्हणाले.