मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कधी अजित पवार आमच्यासोबत आहेत, तर कधी-कधी अजित पवारांना (Ajit Pawar) सर्व दरवाजे बंद केले, अशी गोंधळात टाकणारी विधाने शरद पवार करत आहेत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उभी फूट पडली आहे. तसेच अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन स्वतंत्र गट तयार झाले. परंतु अजूनही खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार अजित पवार आमचेच नेते असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर बोलताना शिवसेना ('उबाठा गटा'चे) खासदार संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट तयार झाले आहेत. शरद पवारांची अजित पवार गटाने अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. तर, शरद पवारांनी अजित पवारांसह त्यांच्या समर्थकांना पक्षातून काढले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन गट आहेत. एका गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. तर, दुसऱ्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. शिवसेनेत फूट पडून काही लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यातच राष्ट्रवादीत फूट पडून एक गट भाजपामध्ये दाखल झाला, असं राऊत यांनी म्हटलं आहे.