मुंबई :मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंची रविवारी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली. यावर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट म्हणजे सदू आणि मधु याची असल्यासारखी भेट आहे. तसा आम्हाला बालभारतीला धडा होता. बालभारतीप्रमाणे ते जुने मित्र असतील, नाहीतर त्यांचे नव्याने प्रेम उफाळून आले असेल. मालेगावातल्या सभेनंतर त्यांच्या भावना उफाळून आल्या असतील, एकमेकांचे अश्रू पुसायला त्यांची भेट झाली असेल, अशी मिश्किल टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
ठाकरे गट आक्रमक :दुसरीकडे सावरकर या मुद्द्यावर आता ठाकरे गट आक्रमक होताना दिसत आहे. मालेगाव येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला. तर संजय राऊत यांनी देखील आजच्या सामनाच्या अग्रलेखात हाच विषय छेडला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, वीर सावरकर यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केलेली आहे. राहुल गांधी यांच्याशी याच विषयावर माझी चर्चा देखील झालेली आहे. तसेच जयराम रमेश यांच्याशी देखील मी बोललेलो आहे. वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय आहेत. महाराष्ट्र वीर सावरकरांचा अपमान कधीही स्वीकारणार नाही. कारण, लहानपणापासून आम्ही सावरकरांपासून प्रेरणा घेत आहोत. लढायला उतरलेलो आहोत. मी आज दिल्ली येथे जात आहे. राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयी चर्चा करणार आहे.