मुंबई :राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, कुणी कुणाच्या वाट्याला गेले नाही. त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद का गेले? हे अख्या जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आले, आणि जोडीला खोके होते. यामुळेच महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार गेले, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
त्यांना ईडीचा चांगलाच अनुभव :पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातले सरकार पाडण्यामध्ये ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या दबावामुळेच महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पडले. ईडी काय आहे? हे मनसे प्रमुखांना वेगळे सांगण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. त्याचा चांगलाच अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आमच्यासारख्या लोकांनी देखील ईडीचा अनुभव घेतला. मात्र, आमच्या तोफा थंडावल्या नाहीत. आमच्या पक्षाचे काम सुरूच राहिले आणि आजही सुरू आहे. असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.