मुंबई : संपूर्ण राज्याच लक्ष पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध होणार का? इथे उमेदवारी कोणाला मिळणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अखेर महाविकास आघाडी व भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप शिंदे गट सुडाचे राजकारण : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, की या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी पत्र लिहिल्याचे समजले. ही पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे आवाहन चांगले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत असेल तर ती बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची आतापर्यंतची परंपरा होती. जी इतकी वर्ष आम्ही सर्वांनी पाळली. पण, राज्यात घाणेरडे राजकारणाची सुरुवात कोणी केली? देवेंद्र फडणवीस म्हणाले होते राजकीय वातावरणात कटुता आहे. मग त्यांनी पुढाकार का घेतला नाही? भाजप आणि शिंदे गट सुडाचे राजकारण करत आहेत."