मुंबई- कौरव सत्तेसाठी लढत होते. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात महाभारत घडत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो, असे केंद्राला वाटत आहे. मात्र, ते कदापी शक्य होणार नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे खडे बोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. मुंबईत गुरुवारी (दि. 1 जुलै) माध्यमांशी बोलत होते.
खोटे आरोप करू नका
राज्यातील विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे तपास करण्याची मागणी भाजपकडून केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो, असे केंद्राला वाटत असेल. तर ते कदापी शक्य नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातले पाहिजे. पण, खोट्या तलवारीचे घाव घालू नका. विरोधक असले तरी ते महाराष्ट्राचे आहेत. आपण एकमेकांना ओळखतो, त्यामुळे खोटे आरोप करणे योग्य नसल्याचेही राऊत म्हणाले.