मुंबई - पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. यात रिपब्लिक टीव्हीचेही नाव समोर आले आहे. टीआरपी घोटाळा हा ३० हजार कोटींचा असून हा स्पेक्ट्रम सारखाच असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामीचा बोलावता धनी वेगळाच असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. त्याचा तपास सध्या सुरू आहे हे सुडाचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलीस अत्यंत प्रोफेशनल आहेत. ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. त्यांचा तपास निःपक्ष असतो. ते कधीही सूडाच्या भावनेने तपास करत नाहीत, असे राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांकडून जी कारवाई झाली ती सुडाची असेल, तर रिपब्लिक चॅनलकडून जो प्रकार सुरू होता ती काय सद्भावना का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला. लोकांना चॅनेल बघण्यासाठी पैसे वाटले, ते ड्रग्स रॅकेटमधून आले, असे कुणी म्हटले तर चालेल का, असा टोलाही राऊत यांनी लगावला.