मुंबई :रिफायनरीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, या प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून साधारण पाच ते सहा हजार लोक त्या बारसूच्या माळरानावर जमलेली आहेत. आम्ही मरु गोळ्या खाऊ पण इथून हटणार नाही, अशी या स्थानिकांची भूमिका आहे. असे असताना या राज्याचे उद्योगमंत्री ज्याप्रमाणे खारघर हत्याकांड घडवून आणले, तसे तुमच्यावर गोळ्या घालू अशा धमक्या स्थानिकांना देत आहेत. साधारण 5 ते 6 हजार लोक आज त्या माळरानावर आंदोलन करत आहेत. अनेक कुटुंब परगंधा झाली आहेत. अनेकांना पोलीस ठाण्यात 24 तास चौकशीच्या नावाखाली बसवून ठेवुन धमक्या दिल्या जात आहेत.
पोलीस दारावर लाथा मारत आहेत :पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पोलिसांनी हजारो नागरिकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. इतकेच नव्हे बारसु, राजापूर येथील जे रहिवासी मुंबईत वास्तव्याला आहेत, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत. पोलीस मुंबईत त्यांच्या घरी जाऊन दारावर लाथा मारून धमक्या देत आहेत. मुंबईत सुद्धा बारसु वासीयांना अटक केली जात आहे. हे अत्यंत विकृत आणि दहशदवादी मनोवृत्तीचे सरकार आहे. मला असे वाटते, त्या माळरानावर बसलेले हजारो विरोधक मागे हटले नाही. तर, त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील. त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसुचे देखील हत्याकांड होऊ शकते, अशी मला भीती वाटते.