मुंबई - आज दुपारी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे आणि माहूल येथील जेट्टीच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने कोळी बांधवांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज - प्रवीण दरेकर
आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये माहुल आणि ट्रॉम्बे या दोन भागांमध्ये मासेमारी करण्यासाठी जेट्टी उभारण्यात आलेल्या आहे आणि आज या वादळामुळे कोळी लोकांच्या जेट्टीमधील बोटींचे, तसेच जेट्टीच्या शेडचे नुकसान झालेले आहे. सदर ठिकाणी खासदार राहुल शेवाळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
वादळाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला. तसेच, प्रशासनाने नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन केले. वादळामुळे प्रभावित झालेल्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवता यावे म्हणून मुंबईत 5 ठिकाणी शेल्टर होम बनविण्यात आले. तसेच, एनडीआरएफच्या तीन पथकांसह फायर ब्रिगेडची सहा पथकेही तैनात करण्यात आली.