मुंबई -राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील वर्षी धारावी हा हॉटस्पॉट झाला होता. या वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गेल्या वर्षी धारावी हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरला होता. राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. 'धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल, तसेच एक अनोखं उदाहरण यानिमीत्ताने सादर करता येईल', असे शेवाळे यांनी पत्रात लिहिले आहे.
'बीपीटीच्या गोडाऊनमध्ये कोविड सेंटर उभारावे'
मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेली बेड्सची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेच्या कोचेसचा वापर करावा, तसेच मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या गोडाऊनमध्ये कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि तुटवडा यावर तोडगा काढण्यासाठी त्याचे वितरण केवळ राज्य सरकारच्या अधिकृत केंद्रामधूनच केले जावे, अशीही सूचना खासदार शेवाळे यांनी केली आहे.
धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्या - राहुल शेवाळे
'धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल, तसेच एक अनोखं उदाहरण यानिमीत्ताने सादर करता येईल', असे शेवाळे यांनी पत्रात लिहिले आहे.
खासदार राहुल शेवाळे