मुंबई- विदर्भ मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी सतत फोन केले. मात्र, मुख्यमंत्री फोन घेत नाहीत. यामुळे राज्यपालांची भेट घेतल्याची तक्रार राणा दाम्पत्याने केली आहे. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न दिल्यास मातोश्री बाहेर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, अशी अपेक्षा खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वीजबिल माफ करण्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवनीत राणा व रवी राणा बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष
मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत विदर्भाचा दौरा केलेला नाही. एकाही खासदाराशी मुख्यमंत्र्यानी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यानी जे पॅकेज घोषित केले त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई देऊ, असे मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे बोलले होते. मात्र, 10 हजार रुपये नुकसान भरपाई त्यांनी दिली आहे. विदर्भात कापसाचे व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री भेटत नसल्याने तसेच फोन उचलत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी मिळाली पाहिजे यासाठी राज्यपालांच्या भेटीला आलो आहोत. शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यपाल मुख्यमंत्र्यांना कळवतील, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. दिवाळी आधी नुकसान भरपाई मिळाली नाही तर फक्त ठाकरे कुटूंबियांच्या घरात दिवाळी साजरी होईल आणि शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधारच राहील, असेही त्या म्हणाल्या.
...तर मातोश्रीबाहेर आंदोलन