मुंबई Amol Kolhe :खासदार अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. पोलिसांना प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात येत असल्याचा दावा अमोल कोल्हे (Amol Kolhe on Triple Engine) यांनी केलाय. मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचारी यांना टार्गेट देण्यात आल्याचं कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच कोल्हे यांनी राज्य सरकारला काही प्रश्न विचारत टीकाही केली आहे.
व्हिडिओत खासदार कोल्हे काय म्हणाले :खासदार कोल्हे यांनी आरोप करताना व्हिडिओत म्हटले आहे की,, आपण मुंबईतून जात असताना एका चौकात एका महिला पोलीस भगिनीने आपल्याला अडवले. तसेच काहीतरी कारण सांगून ड्रायव्हरला दंड भरण्यास सांगितले. याबाबत आपण सदर महिला पोलिसाला विचारले असता त्यांनी आपल्याला ओळखल्यानंतर वरिष्ठांकडून आलेला मेसेज दाखवला. प्रत्येक चौकामध्ये पंचवीस हजार रुपये दंड वसूल झालाच पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आल्याचं त्या महिला पोलीस भगिनीने सांगितले. तो मेसेज पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसला. एका चौकात जर पंचवीस हजार रुपये वसुलीचे निर्देश असतील तर प्रत्येक चौकातील वसुली पाहता किती रुपये हे सरकार वाहनधारकांकडून घेणार आहे? याचा अंदाज येईल. सदर महिला पोलीस भगिनीचे आपण नाव अथवा तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, या घटनेने आपल्याला धक्का बसला असून सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट थांबवावी. तसेच याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही खासदार कोल्हे यांनी केली आहे.
अमोल कोल्हे यांची पोस्ट :
आजचा धक्कादायक अनुभव-
मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!