मुंबई - 'प्रधानमंत्री आवास योजने'अंतर्गत नवी मुंबईत होत असलेल्या ९५ हजार घरांच्या प्रकल्पाला स्थानिकांचा आक्षेप आहे. सिडकोने हा प्रकल्प इतर जागेवर हलवावा, अशी स्थानिकांची मागणी असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकल्पावर असलेले आक्षेप लक्षात आणून देण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.
'सिडको'मार्फत होणारा प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प कामोठे, खारघर व खांदेश्वर येथील नागरिकांवर अन्याय करणारा आहे. नरेंद्र मोदींना निवडणुकीआधी उद्घाटन करण्यासाठी घिसाडघाईने सिडकोच्या माथी हा प्रकल्प मारण्यात आला. या प्रकल्पासाठी भूखंडावरील नागरी सुविधांचे आरक्षण जनसुनावणी न घेता बदलण्यात आले. नागरिकांची कुचंबणा होत आहे. खांदेश्वर वसाहतीमधील प्रकल्पाच्या जागेवर बसस्थानक होणार होते, तेथे हा प्रकल्प होत असल्याने नागरिकांचा विरोध आहे, तर रोडपाली गावाजवळ होत असलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पामुळे तेथे असलेले एकमेव मैदान बंद होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली.