महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरक्षेसाठी आईनेच मुलीच्या पायात घातल्या बेड्या

एका आईने आपल्या ७ वर्षांच्या चिमुरडीला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सपना कौर असे या मुलीच्या आईचे नाव आहे

पीडित मुलगी

By

Published : Feb 22, 2019, 1:09 PM IST

मुंबई - एखाद्या भयंकर घटनेचे कधी कुठे आणि कसे पडसाद उमटतील हे सांगता येत नाही. आपली लहान मुलगी सुरक्षित राहावी. यासाठी फुटपाथवर राहणाऱ्या एका मातेने स्वतःच्याच मुलीला साखळदंडात बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी माहीम परिसरात एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आला होता. यानंतर त्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असा प्रकार आपल्या मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून मी असे पाऊल उचलले, असे मुलीच्या आईने सांगितले.

एका आईने आपल्या ७ वर्षांच्या चिमुरडीला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सपना कौर असे या मुलीच्या आईचे नाव आहे. या महिलेवर नेटिझन्सने कॉमेंट्सही केल्या होत्या. अनेकांनी तिच्यावर टीकादेखील केली होती. मात्र, तिने मुलीला का बांधून ठेवले होते? याचे कारण समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ‘आपल्या मुलीवर कुणी बलात्कार करू नये, म्हणून मी तिला साखळीने बांधून ठेवले होते’, अशी स्पष्टोक्ती या महिलेने दिली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच काय करावे असा प्रश्न पडला आहे.

सायनच्या पंजाब कॉलनीच्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब राहते. अनेक नराधम गर्दुल्यांच्या भीतीने हे कुटुंब दिवस काढत आहे. मात्र महिममधल्या त्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाऱ्याने या मातेचे काळीज हेलावून गेले आहे. महिममधली ती चिमुरडीदेखील फुटपाथवर आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. त्यामुळे असा प्रकार आपल्या मुलीच्या बाबतीत घडू नये, म्हणून या मातेने चक्क साखळदंड आपल्या मुलीला बांधला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी आणि पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि मुलीला या कैदेतून मुक्त केले. मात्र या कैदेत ठेवण्याचे कारण मुलीच्या आईच्या तोंडून ऐकून सगळेच गप्प झाले.

या कुटुंबात ६५ वर्षांची एक वृद्ध महिला, तिचा ४० वर्षांचा अपंग मुलगा, पतीने सोडून दिलेली २५ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांची नात असे सदस्य आहेत. या साखळदंडाची चावी आजी आणि आईकडे असते तिला काही वेळ रिकामीदेखील केले जाते. मात्र, पुन्हा तिच्या पायात बेड्या पडतात. ही चिमुरडी थोडी खोडकर आहे, म्हणून ती नजरेसमोरून कुठेही जाऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details