मुंबई :कौटुंबिक क्षुल्लक वादातून सूनेने ७२ वर्षांच्या वयोवृद्ध सासूला बेदम मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी खार परिसरात घडली. या मारहाणीत वेणूबाई वाते ही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांना हालचालही करता येत नव्हती. अशा वेळेस खार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई निकिता म्हात्रे हिने या वयोवृद्धेला हाताच्या कडेवर उचलून इमारतीच्या चवथ्या मजल्यावरुन खाली आणले. शंभर मीटर अंतरावरुन तिला घेऊन पोलीस व्हॅनमधून वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिला दिनी एका महिलेने दुसर्या महिलेला केलेल्या मदतीसह तिच्या या कामगिरीचे पोलीस दलात सर्वत्र कौतुक होत आहे.
सूनेची बेदम मारहाण :वेणूबाई वाते ही ७२ वर्षांची वयोवृद्ध महिला खार येथील खारदांडा, सप्तश्रृंगी निवास इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहते. ८ मार्चला महिला दिनीच क्षुल्लक कौटुंबिक वादातून वेणूबाई यांना तिच्याच सूनेने बेदम मारहाण केली होती. मारहाणीत ती जखमी झाली होती. जखमी झाल्याने तिचा काहीच हालचाल करता येत नव्हती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक माणिक घोगरे, पोलीस शिपाई विशाल घार्गे आणि निकिता म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना घडलेला प्रकार समजला. मारहाणीमुळे वेणूबाईला काहीच हालचाल करता येत नव्हती. तिला वैद्यकीय उपचाराची तातडीने गरज होती. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न पाहता शिपाई निकीता म्हात्रे हिने वेणूबाईला हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरुन खाली आणले.