मुंबई -निशांत कुमार आणि त्याची आई गुंजन कुमार यांची ही कहाणी स्त्रीच्या दानशूरपणाची साक्ष देते. १४ वर्षांचा निशांत कुमार क्रॉनिक किडनी डिसीजशी (तीव्र मूत्रपिंडाच्या आजाराशी) झुंज देत होता. पण त्याची आई गुंजन कुमार यांनी त्याला अनमोल भेट देऊन त्याला पुन्हा एकदा नवे आयुष्य प्रदान केले आहे.
मुंबई : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करून १४ वर्षांच्या मुलाला दिले पुनर्जीवन झारखंडमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन मुलाला १० नोव्हेंबर २०२० रोजी आकडी आली आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर सूज होती. यासाठी धनबागमधल्या एका स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. डॉक्टरांनी तपासल्यावर त्या मुलाला क्रॉनिक किडनी डिसीज झाल्याचे समजले. या तणावाच्या परिस्थितीत त्या कुटुंबाने आपल्या सर्व नातेवाईकांना संपर्क करायला सुरुवात केली.
निशांतवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
निशांतच्या प्रकृतीच्या गंभीर स्थितीची जाणीव झाल्यानंतर नवी मुंबईतील नातेवाईकाने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाला भेट देऊन त्यांचा सल्ला घेण्यास सांगितले. नेफ्रॉलॉजी विशेष तज्ज्ञ डॉ. रविंद्र निकाळजी आणि रोबोटिक युरोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीचे विशेष तज्ज्ञ डॉ. अमोल कुमार पाटील यांनी केलेल्या सखोल वैद्यकीय तपासणीमुळे कुटुंबाला हे कळलं की, त्यांच्या मुलावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पुढील मूल्यमापन केल्यानंतर असे लक्षात आले की, रुग्णाची आई गुंजन कुमार रुग्णाला मूत्रपिंड दान करण्यास योग्य आहे. त्यानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी डॉ. रविंद्र निकाळजी आणि डॉ. अमित लंगोटे आणि विशेष तज्ज्ञांच्या पथकाद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली.
मी माझ्या मुलाला ही अनमोल भेट देऊ शकले..
आपल्या मुलाला मूत्रपिंड दान करणाऱ्या गुंजन कुमार म्हणाल्या की, 'माझ्या मुलाच्या मूत्रपिंडाच्या अवस्थेविषयी जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आम्ही हादरून गेलो होतो. आम्ही संकटात सापडलो होतो. आम्हाला कळत नव्हते की, अशा परिस्थितीत आम्हाला कोण मदत करेल. जेव्हा मला कळले की, मी मूत्रपिंड दान करण्यास योग्य व्यक्ती आहे, त्यावेळी मी क्षणाचाही विचार न करता किंवा संकोच न करता लगेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी होकार दिला. माझ्या मुलाला नवे आयुष्य मिळाल्यामुळे तसेच, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे. मी माझ्या मुलाला ही अनमोल भेट देऊ शकले, हे मनाला खरेच खूप समाधान देणारे आहे.'
हेही वाचा -शुभवर्तमान.. पती-पत्नीचा रक्तगट भिन्न असूनही किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे नेफ्रॉलॉजी तज्ञ डॉ. रविंद्र निकाळजी म्हणाले, 'निशांतच्या आईने त्याला अवयव दान करून स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतात आणि त्या दानशूरही असतात, हे दाखवून दिले आहे. आम्ही चाचण्या केल्यावर आम्हाला कळले की त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे. बऱ्याचदा आम्ही रुग्णावर डायलिसिस उपचार करतो. पण निशांतच्या बाबतीत मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची खूप आवश्यकता होती. वैद्यकीय मूल्यांकन केल्यानंतर, त्याची आई मूत्रपिंड दान करण्यास योग्य व्यक्ती असल्याचे समजले. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली असून दाता आणि रुग्ण दोघांचीही तब्येत उत्तम आहे.'
मुलाच्या प्रत्यारोपित मूत्रपिंडाची कार्यशक्ती चांगली
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे रोबोटिक युरोलॉजी आणि मूत्रपिंड शल्यविशारद तज्ञ डॉ. अमोल कुमार पाटील या प्रकरणाबद्दल सविस्तर सांगताना म्हणाले की, 'मूत्रपिंडाची कार्यशक्ती खूप बिघडल्यामुळे आम्ही रुग्णावर हेमोडायलिसिस उपचार केले. आठवड्यातून दोन वेळा त्याला डायलिसिस देण्यात येत होते, त्याचबरोबर आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्लाही दिला होता. तेव्हा त्या मुलाची आई श्रीमती गुंजन कुमार पुढे आली आणि तिने मूत्रपिंड दान करण्याची इच्छा व्यक्त केली. चाचणी केल्यानंतर त्याची आई मूत्रपिंड दान करण्यास योग्य असल्याचे समजले. आम्ही ३ फेब्रुवारीला शस्त्रक्रियेचे नियोजन केले आणि मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्या मुलाच्या मूत्रपिंडाची कार्यशक्ती आता चांगली आहे आणि सामान्य क्रिएटिनाईन आढळल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.'
हेही वाचा -कुणी किडनी देता का?, सोलापुरात पन्नासहून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत