नवी मुंबई -बाळाचे मस्तक धडावेगळे करून आईने स्वतः आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील वाशी पूल परिसरात घडली आहे. याप्रकरणी मृत मातेवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या महिलेने स्वतःच्या 1 वर्षीय बाळाची हत्या केल्यानंतर त्याच्या देहाचे तुकडे बॅगमध्ये भरले व बॅगसह धावत्या लोकल ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा घडली.
महिलेचे मानसिक संतुलन बिघडले होते -
ही महिला चेंबूर येथे रहिवासी असून तिचा पती सिव्हील इंजिनियर आहे. वर्षभरापूर्वी या महिलेने एका मुलाला जन्म दिला होता. तेंव्हापासून ती तिच्या माहेरी पुण्यातील हडपसर येथे राहत होती. 6 फेब्रुवारीला तिच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी या महिलेची आई बाजारात गेली होती. हीच संधी साधून कोणालाही न सांगता मृत महिला आपल्या मुलाला घेऊन मुंबईला निघाली. दरम्यान, मृत महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने तिने बाळाची हत्या केली असल्याची माहिती जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे.