मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी सुरू केलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत ७८ विमानांनी १२ हजार ९७४ प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ४ हजार ८४१ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ४ हजार ११९ इतकी आहे. तर, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ४ हजा १४ इतकी आहे, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर, १ जुलै २०२० पर्यंत आणखी ८० विमानांनी मुंबईत प्रवासी येणार आहेत.
वंदे भारत मिशन : ७८ विमानातून १२ हजार ९७४ प्रवासी मुंबईत दाखल - कोरोना परिस्थिती बातमी
वंदे भारत अभियानांतर्गत ७८ विमानांनी १२ हजार ९७४ प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ४ हजार ८४१ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ४ हजार ११९ इतकी आहे. तर, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ४ हजा १४ इतकी आहे, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
'वंदे भारत' हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे. या अभियानांर्गत आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.