मुंबई -कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने देशात आणि राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील अनेक भागात आता 'कम्युनिटी स्प्रेड' वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील वरळी भागात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर (अधिक रुग्णांची संख्या) सापडली आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्र (पथकांची संख्या २९२), पुणे महापालिका (४१३), पिंपरी चिंचवड महापालिका (३८), पुणे ग्रामीण भाग (३३१), ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका(१४०), कल्याण डोंबिवली महापालिका (८२), नवी मुंबई महापालिका (१६९), उल्हासनगर(९०), रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका(६५), रत्नागिरी (५४), अहमदनगर जिल्हा (१५) व महापालिका क्षेत्र (२५), यवतमाळ (५२), नागपूर महापालिका (२१०), सातारा (१८२), सांगली (३१), पालघर जिल्ह्यातील वसई विरार (७०), सिंधुदूर्ग (१९), कोल्हापूर महापालिका (६), गोंदीया (२०), जळगाव महापालिका (३६), बुलडाणा (९४), नाशिक ग्रामीण (२८) क्षेत्रात सध्या ही सर्व्हेक्षण पथके कार्यरत आहेत.
असा आहे कंटेनमेंट आराखडा -
ज्या भागात कोरोनाचे ३ किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबविली जात आहे. त्यानुसार बाधित रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे ३ किलोमीटर पर्यंतच्या भागाचे सर्व्हेक्षण केले जाते. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघर जाऊन लोकांचे सर्व्हेक्षण केले जाते. सध्या राज्यात ज्या भागात १ रुग्ण जरी बाधित आढळून आला तरीदेखील सर्व्हेक्षणाचे काम केले जात असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.