मुंबई - मार्च 2020पासून देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्था आणि सर्व घटकांना बसला आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रालाही याची मोठी झळ सोसावी लागत आहे. आजच्या घडीला देशभरातील तब्बल 4 लाख 22 हजार घरांचे बांधकाम रखडले आहे. या घरांचे काम मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता ही घरे डिसेंबर 2021मध्ये पूर्ण होण्याची शक्यता एनारॉक प्रॉपर्टी कंसल्टेंट्सने व्यक्त केली आहे.
देशातील सात ठिकाणचे काम रखडले -
देशात घरांच्या टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे साहजिकच घरांना मोठी मागणी असल्याने देशात दरवर्षी मोठ्या संख्येने नवनवीन गृहप्रकल्प हाती घेतले जातात. मोठ्या संख्येने घरांचे बांधकाम सुरू असते. तर बांधकाम वेळेत पूर्ण करत घराचा ताबा वेळेत देण्याचा बिल्डरांचा प्रयत्न असतो. अशावेळी गेल्या वर्षभरापासून देशातील 4 लाख 22 हजार घरांचे बांधकाम संथ गतीने सुरू आहेत तर काही प्रकल्प रखडले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका या कामांना बसला आहे. मजुरांची कमतरता आणि आर्थिक अडचणीमुळे काम रखडत असल्याचे चित्र आहे. ही रखडलेली 4 लाख 22 हजार घरे देशातील 7 प्रमुख शहरातील आहेत. यात दिल्ली आणि आसपासच्या भागातील (एनसीआर) 1 लाख 16 हजार 730, मुंबई महानगर प्रदेशा (एमएमआर) तील 1 लाख 9 हजार 940, बंगळुरुतील 56 हजार 680, पुण्यातील 74 हजार 200, कोलकात्यातील 27 हजार 470, चेन्नईतील 21 हजार 830 तर हैदराबादमधील 15 हजार 860 अशा एकूण 4 लाख 22 हजार 500 घरांचा समावेश आहे. या रखडलेल्या घरांपैकी 73 टक्के घरे विकली गेली आहेत. तर यातील मध्यम गटातील घरे मोठ्या संख्येने आहेत. ऍनारॉकच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. घराचे काम रखडल्याने एकीकडे बिल्डरांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे ग्राहकांना ही याचा फटका बसत आहे. त्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.