मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांचे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली आहे. रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 466 दलालांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. अटक केलेल्या दलालांकडून 2 कोटी 78 लाख किंमतीचे एकूण 14 हजार 343 तिकिटे जप्त केल्या आहे.
मध्य रेल्वेच्या पाचही विभागात कारवाई
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात फक्त आरक्षित तिकिटांवरच प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. अनेक तिकीट दलाल एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा तिकीट दलालाविरोधात मोहीम सुरू केली आहे. आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि इतर माहितीच्या आधारे छापेमारीही केली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांवर हे छापे टाकण्यात आले.