मुंबई - वंदेभारत अभियानांतर्गत 72 विमानांमधून तब्बल 11 हजार 666 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4 हजार 313 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 3 हजार 729 इतकी आहे. तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 3 हजार 624 इतकी आहे.
हे प्रवासी ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवैत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज आदी देशातून मुंबईत दाखल झाले आहेत.
1 जुलै, 2020 पर्यंत आणखी 37 विमानांनी प्रवासी येणे अपेक्षित
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक 24 मे, 2020 रोजी मार्गदर्शक सुचना तयार केल्या आहेत. त्याअनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाइन केले जात आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने पार पाडले जात आहे.
वंदेभारत अभियानांतर्गत 11 हजाराहून अधिक प्रवासी मुंबईत दाखल - वंदेभारत अभियान बातमी
वंदेभारत अभियानांतर्गत 72 विमानांमधून तब्बल 11 हजार 666 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी एकट्या मुंबई शहरातील 4 हजार 313 प्रवासी आहेत.
संग्रहित छायाचित्र