मुंबई - मंत्रिमंडळाची या सत्रातील दुसरी आणि शेवटची बैठक आज सोमवारी पार पडली. या दुसऱ्या बैठकीत ४१ पेक्षा जास्त विषयांना मंजूरी देण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
बैठकीत मंजूर झालेल्या विषयांबाबत माहिती देताना सुधीर मुनगंटीवार
यामध्ये 19 जिल्ह्यात बचत गटांना कुक्कुटपालनासाठी निधी दिला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रीडला मंजूरी तसेच, 59 महिन्यात शेतकरी, उद्योजक आणि सर्वांच्या सहकार्यांना 69 हजार कोटी रुपये अर्थव्यस्थेचे लक्ष आहे. दरवर्षी 4 हजार डॉक्टर तयार होतात यापैकी १० टक्के जागा कमीतकमी ७ वर्ष कंत्रांटीवर काम करणाऱ्या डॉक्टरांकरिता आरक्षित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
सरकारी कामांना रॉयल्टीमधून सुट देण्यात आली आहे. राज्याचा 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थचे लक्ष गाठण्याचा प्रयत्न असणार आहे. या सोबतच संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०३० पर्यंतच्या १७ मुख्य उद्दिष्टांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचा संकल्पासारखे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय -
1. विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ.
2. राज्यातील कुष्ठरोग पीडित नागरीकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुख्यमंत्री आवास योजना राबविण्यास मान्यता.
3. दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापण्यात येणार.
4. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याबाबत उपसमिती.
5. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करून त्यांच्या जीवन कार्यावर संशोधन व प्रबोधन करण्यास मंजुरी.
6. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील विस्थापित वसाहतीत विस्थापितांनी विनापरवाना केलेली निवासी व वाणिज्यिक हस्तांतरणे नियमित करण्याबाबत उपसमिती स्थापन.
7. पिण्याच्या पाण्याची ग्रीड करण्यासाठी हायब्रीड न्यूईटी मॉडेलवर आधारित लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाठीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यास निविदा काढणार.
8. मुंबईमध्ये सोळा समर्पित व्यावसायिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता.
9. संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेली 17 शाश्वत विकास ध्येये आणि 169 लक्ष्ये 2030 पर्यंत राज्यात साध्य करण्यासाठी शाश्वत विकास ध्येय-अंमलबजावणी आणि समन्वय केंद्र स्थापण्यास मान्यता.
10. अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालय स्थापन्यास मान्यता.
11. परवाना निलंबनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांकडे केलेल्या अपिलाच्या निर्णयावर शासनाकडे द्वितीय अपील करण्याबाबत नियम तयार करण्यास मान्यता.
12. शासनाच्या सेवेमध्ये दीर्घकाळ काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेशाच्या वेळेस आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यास मान्यता.
13. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांतर्गत प्रगतीत असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांसाठी खडी, रेती, माती, मुरूम इत्यादी गौण खनिजांवरील स्वामित्वधन माफ.
14. पालघर जिल्हा मुख्यालयांतर्गत बांधण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शासकीय इमारतींमधील अंतर्गत सजावट व फर्निचरची कामे सिडकोमार्फत करण्यास व त्याबदल्यात त्यांना केळवे रोड येथील जमीन देण्यास मान्यता.
15. नागपूर विकास योजनेतील मौजा जयताळा येथील 1.22 हेक्टर जागेचा वापर सार्वजनिक बाबींसाठी करण्यास मान्यता.
16. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्था, रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंग्यातील शासन मालकीचे अभिमत विद्यापीठ व लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील शिक्षकीय व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू.
17. नागपूर येथील रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशनच्या अभिहस्तांतरण दस्ताचे मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ.
18. विक्रोळी येथे परवडणाऱ्या दरात रुग्णालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील शुश्रुषा सिटीझन कॉ-ऑपरेटिव्ह हॉस्पिटलला शासकीय भागभांडवल.
19. महाराष्ट्र परिचारिका अधिनियम-1966 मध्ये सुधारणा.
20. जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पास मान्यता देण्यासह बँकेबरोबर करार करण्यास मान्यता.
21. नवलभाऊ प्रतिष्ठानचे औरंगाबाद येथील विधि महाविद्यालय व संगमनेरच्या ओमकारनाथ मालपाणी विधि महाविद्यालयास अनुदान मंजूर.
22. पीएचडी झालेल्या अधिव्याख्यात्यांना 1 जानेवारी 1996 पासून दोन वेतनवाढी देण्यास मान्यता.
23. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दफनभूमीसाठी हवेली तालुक्यातील मौजे मोशी येथील 5 एकर जागा विनामुल्य देण्यात येणार.
24. कॉ. गोदूताई परुळेकर महिला, मॉसाहेब आणि स्वामी समर्थ विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेला अकृषिक आकारणीतून सूट.
25. चिमूर (जि. चंद्रपूर) येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीस मान्यता.
26. विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमधील बचतगटांतील 19 हजार लाभार्थ्यांना अंड्यावरील कोंबड्याचे गट वाटप करण्यासह कुक्कुट विकासाचे निर्धारित उपक्रम राबविण्यास मान्यता.
27. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजनेस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता.
28. जळगाव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास सातवी सुधारित प्रशासकीय मान्यता.
29. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.
30. शहापूर तालुक्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्पास सहावी सुधारित प्रशासकीय मान्यता.
31. भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा-1 (हतनूर प्रकल्प) प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता.
32. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय तसेच आयुष संचालनालय अधिनस्त अध्यापकीय पदांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसनुसार सातवा वेतन आयोग लागू.
33. विद्यापीठे आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त शिक्षकीय प्रवर्गातील अध्यापकांच्या व्यावसायिक क्षमतेचा प्रशिक्षणाद्वारे नियमित विकास करण्यासाठी अध्यापक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी उपसमिती.
34. शासनाकडून किंवा शासन अधिनस्त प्राधिकरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून राबविण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेत घर-सदनिका मिळालेल्या व्यक्तीस शासनाच्या त्या किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत दुसरे घर-सदनिका देता येणार नसल्याबाबतचे धोरण ठरविण्यास मान्यता.
35. ठाणे, पुणे व नागपूरमधील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करून मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करणार.
36. अर्थ सांख्यिकी संचालनालयाची पुनर्रचना करण्यास मान्यता.
37. विक्रमगड तालुक्यातील (जि.पालघर) देहरजी पाणी पुरवठा प्रकल्प एमएमआरडीएने डिपॉझिट वर्क म्हणून जलसंपदा विभागाकडून करण्यास मान्यता.