मुंबई - एप्रिलमध्ये मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आणि मुंबईतील उपलब्ध बेड्स कमी पडू लागले. राज्य सरकारने बीकेसीत पहिले कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि मेमध्ये पहिला टप्पा तर जूनमध्ये दुसरा टप्पा सुरू झाला. 2000 बेडस हे सेंटर महामारीच्या काळात आणि आता लसीकरणाच्या वेळी नवसंजीवनी ठरताना दिसत आहे. कारण या सेंटरमधून आतापर्यंत 12 हजाराहून अधिक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता लसीकरणातही हे सेंटर आघाडीचे ठरले आहे. कारण या सेंटरमध्ये लसीकरण केंद्र तयार होऊन येथे ड्राय रन ही पार पडली आहे.
2000 बेड्सचे सुसज्ज कोविड सेंटर -
बीकेसी येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) च्या जागेवर दोन टप्पात या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. एमएमआरडीएने 2000 बेडच्या सेंटरची उभारणी करत मुंबई महानगर पालिकेकडे सोपवले आहे. त्यानुसार आता या सेंटरचे व्यवस्थापन पालिकेकडून केले जात आहे. या सेंटरमध्ये कोविड रुग्णांवर योग्य ते उपचार देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. येथे नॉन ऑक्सिजन बेड्स 896 इतके असून ऑक्सिजन बेडची संख्या 928 इतकी आहे. तर 108 आयसीयू बेडस असून 12 बेड्स हे डायलीसीसचे आहेत. त्यामुळे हे सेंटर एका सुसज्ज रुग्णालयाप्रमाणे उभारण्यात आले असून हे सेंटर सरकारी-पालिकेच्या आरोग्य यंत्रणावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
आतापर्यंत 13585 रुग्णांवर उपचार -
मेमध्ये पहिला टप्पा आणि जूनमध्ये दुसरा टप्पा सुरू झाला. या सेंटरमध्ये तेव्हापासूनच रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच आतापर्यंत पहिला आणि दुसऱ्या टप्पामधील नॉन ऑक्सिजन-ऑक्सिजन अशा 1824 बेड्सच्या या सेंटरममध्ये 12236 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील 12023 रुग्ण आतापर्यंत ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता 246 रुग्ण सक्रिय आहे. आयसीयू बेड, डायलीसिस बेड आणि ऑक्सिजन-नॉन ऑक्सिजन असे सर्व बेड मिळून विचार केला तर आतापर्यंत येथे 13585 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र ऑक्सिजन-नॉन ऑक्सिजन बेड अंतर्गत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचा आकडा उपलब्ध होऊ शकला आहे. त्यानुसार 12023 रुग्ण बरे झाले असले तरी आयसीयू बेड-डायलसिस बेडचा विचार केला तर हा आकडा नक्कीच 13 हजाराच्या आसपास जाईल अशी शक्यता आहे.