मुंबई :मणिपूर मधील हिंसाचारच्या मुद्द्यावर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर काहीच बोलत नसल्याने, सभागृहात सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो मंजूर करून घेतल्याने यावर आता मतदान होणार आहे. असे असले तरी पंतप्रधान मोदी मणिपूरच्या प्रश्नावर उघडपणे बोलतील का? असा प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
वी द पीपल ऑफ इंडिया : पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी, काल "इंडिया" या शब्दावरून अतिशय बालिशपणाचे आरोप पंतप्रधानांनी विरोधकांवर लावले आहेत. लढाई ही विचारांची असायला हवी. "इंडिया" नावाला कोणाचाही आक्षेप असता कामा नये. प्रत्येक ठिकाणी "इंडिया" हा शब्द वापरला जातो. "वी द पीपल ऑफ इंडिया" असे वारंवार म्हटले जाते. त्या कारणाने विनाकारण काहीतरी मुद्दा उकरून काढायचा हे बरोबर नाही. पंतप्रधानांनी इंडिया या मुद्द्यावर बोलण्याऐवजी मणिपूर या विषयावर बोलणे जास्त सोयीस्कर असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
आपली पाठ थोपटून घेण्याचे काम: एकीकडे मणिपूरचा मुद्दा धुमसत असताना दुसरीकडे भारत जगात अर्थव्यवस्थेत पाचव्या नंबरवर आल्याने, आपली पाठ थोपटून घेण्याचे काम मोदी सरकार करत आहे. परंतु वास्तविकतेमध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दरडोई उत्पन्नामध्ये जगात भारताचा क्रमांक १५० वा आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकसंख्येचा देश असल्याकारणाने, अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असणार यात काही शंका नाही. त्याचबरोबर भारताने प्रगती करायला हवी हे सुद्धा मान्य आहे. परंतु दरडोई उत्पन्नावर देशातील शिक्षण, आरोग्य याची परिस्थिती ठरत असते. परंतु दरडोई उत्पन्नावरसुद्धा मोदी सरकार एक शब्द बोलायला तयार नाही, असे सांगत कशाच्या आधारावर मोदी सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.