मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. राज्यातील पूरजन्य परिस्थिती आणि पाऊस यावरून आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार, आमदार नाना पटोले यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काही ठिकाणी पुरामुळे शेतीचे नुकसान होत आहे, तर काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या संदर्भात राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या, याबाबत तातडीने सभागृहात माहिती द्यावी अशी मागणी आमदारांनी केली.
सर्वांना योग्य मदत दिली जाईल :या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले की, राज्य सरकारने राज्यातील पूर परिस्थितीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असून पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्या संदर्भात जिथे शक्य आहे तेथे स्थलांतर आणि जिथे शक्य आहे तिथे मदत केली जाणार आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सातत्याने 'कोसळणारा पाऊस आणि कोसळणाऱ्या दरडी' लक्षात घेता, या भागामध्ये एनडीआरएफचे बेस कॅम्प तयार करण्याबाबत आमदार संजय कुटे यांनी सूचना केली आहे. त्याप्रमाणे या भागात एनडीआरएफचे कॅम्प करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करील, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.