मुंबई : मुंबईत पावसाचे आगमन झाले असून कालपासून पावसाने जोर धरला आहे. आजही मुंबईमध्ये पावसाची संततदार सुरू आहे. मुंबईत नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने पाऊस जोर धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनच्या पावसाचा आनंद मुंबईकरांनी घेतला आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने मान्सूनच्या पहिल्या रविवारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. इतके दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आज रविवारची पहाट अनोखी होती. हवेमध्ये असलेला गारवा आणि रिमझिम पडणाऱ्या पावसाचा मुंबईकरांना मनसोक्त आनंद घेतला. परंतु काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
गर्दीने फुलून मरीन ड्राईव्ह गेला : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या आगमनाने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यातच जून महिन्याचा शेवटचा रविवार आणि या रविवारची पहाट मरीन ड्राईव्हवर घालवण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेष करून मरीन ड्राईव्हचा संपूर्ण परिसर हा मुंबईकरांच्या गर्दीने फुलून गेला होता. त्याचबरोबर मुंबई बाहेरून आलेले पर्यटक सुद्धा येथे पावसाचा आनंद घेताना दिसून आले. विशेष म्हणजे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अनेक मुंबईकरांनी विविध प्रकाराद्वारे या पावसाचा आनंद घेतला. काहीजण व्यायाम करताना दिसून आले काहीजण वॉक करत होते. तर काहीजण योगा करताना दिसून आले. तर काहीजण या आनंदी वातावरणात मरीन ड्राइवच्या किनाऱ्यावर फोटोसेशन करताना दिसून आले.
गाण्याच्या तालावर नाचले नागरीक : आज सुट्टीच्या दिवशी मान्सूनच्या पहिल्या रविवारी मरीन ड्राइवर ड्राइव्हवर अनेकजण गरब्याच्या तालावर नाचताना दिसून आले. यामध्ये सर्वच वर्गातील लोकांनी सहभाग घेतला होता. हवामान खात्याकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. परंतु मुंबईत आज कितीही पाऊस बरसला तरी सुद्धा त्या पावसाचा मनमुराद आनंद घेण्याचे मुंबईकरांनी ठरवले असून त्यासाठीच त्यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती. मुंबईमध्ये पहिल्या पावसाचा आनंद फारच वेगळा असतो. त्यातच मरीन ड्राईव्हसारखा परिसर असेल तर, "सोने पे सुहागा" असे मुंबईकरांनी सांगितलं आहे.