मुंबई - अनेक दिवसांपासून दडी मारल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे मुंबईतील हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकर काहीसे सुखावले आहेत. त्यात मान्सून आजपासून पूर्णतः सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पण आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार 30 जूननंतरच मान्सून हा मुंबईत पूर्णपणे सक्रिय होणार आहे.
काश्मिरात मान्सून दाखल - महाराष्ट्रापासून कोसे दूर असलेल्या जम्मू-काश्मिरात सध्या मान्सून दाखल झाला आहे. अंदमान निकोबार हे मान्सुनसाठी प्रवेशद्वार आहे. त्यानंतर मान्सून हा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणामार्गे महाराष्ट्रात दाखल होता. महाराष्ट्रामार्गे हा मान्सून पुढे गुजरात आणि त्यापुढे नॉर्थ भारतात प्रवेश करतो. पण सध्याची स्थिती पाहता मान्सून हा महाराष्ट्रापासून दूर असलेल्या काश्मिरात दाखल झाला आहे. पण, महाराष्ट्रात अजून पूर्णपणे तो सक्रिय झालेला नाही. मुंबईला समुद्रकिनारा असूनही मान्सून मुंबईत दाखल होण्यास उशीर होत आहे. पण हाच मान्सून जम्मू-काश्मिरात दाखल झाला आहे.
बिपरजॉयमुळे मान्सून लेट- मुंबईसह राज्यातील अनेक भागात मान्सून हळूहळू सक्रीय होताना दिसत आहे. दरवर्षी राज्यात पावसाला ७ जून रोजी सुरुवात होते. पण यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता. कोकणात ११ जून रोजी मान्सून थोड्याफार प्रमाणात आल्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. आजपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. पण हा मान्सून पूर्णपण सक्रिय होण्यास 30 जून ही तारीख उजाडेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.