मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे चेंबुर ते जेकब सर्कल ही मुंबईतील पहिली मोनोरेल सेवा २२ मार्चंपासून बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॅाकडाऊनची हाक दिल्यानंतर ३१ मार्चपर्यंत मोनोरेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन संपेपर्यंत मोनोरेल बंद राहणार असल्याची माहिती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दिली आहे.
हेही वाचा-लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार
कोरोनाला रोखण्यासाठी २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यानुसार एमएमआरडीएने या दिवशी संपूर्ण दिवस मोनोची सेवा बंद ठेवली. सोमवारी २३ मार्चला मोनो नियमितपणे धावणार होती. मात्र, २३ मार्चपासून २१ दिवसांपर्यंत देशभर लॅाकडाऊन लावण्यात आला. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन असताना, एमएमआरडीएने मात्र मोनोरेल १४ एप्रिलपर्यंत बंद राहिल का? याबद्दल काहीही जाहीर केले नव्हते.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ने मात्र १४ एप्रिलपर्यंत मेट्रो सेवा बंद राहिले, असे जाहीर केले. मात्र, मोनोबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, मंगळवारी एमएमआरडीएने मोनो सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद राहील, असे म्हणत प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे जाहीर केले आहे.