महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोनोच्या दिवसाला केवळ 30 फेऱ्या; सकाळी 11.15 ते दुपारी 4.09 पर्यंत सेवा बंद - मोनो रेल मुंबई

मोनोच्या केवळ 30 फेऱ्या होणार आहेत. त्यातही मोनोची सेवा सकाळी 11.15 ते दुपारी 4.09 दरम्यान बंद राहणार आहे. तेव्हा या वेळेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना इतर पर्यायच स्वीकारावा लागणार आहे.

मोनोच्या दिवसाला केवळ 30 फेऱ्या; सकाळी 11.15 ते दुपारी 4.09 पर्यंत सेवा बंद
मोनोच्या दिवसाला केवळ 30 फेऱ्या; सकाळी 11.15 ते दुपारी 4.09 पर्यंत सेवा बंद

By

Published : Oct 18, 2020, 5:32 PM IST

मुंबई -आजपासून चेंबूर ते जेकब सर्कल मोनोसेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा अद्याप नाही. अशावेळी चेंबूर ते जेकब सर्कल असा प्रवास करणाऱ्यांना मोनोमुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे. मात्र, त्याचवेळी मोनोच्या फेऱ्या मात्र कमी करण्यात आल्या आहेत. मोनोच्या केवळ 30 फेऱ्या होणार आहेत, तर मोनोची सेवा सकाळी 11.15 ते दुपारी 4.09 दरम्यान बंद राहणार आहे. तेव्हा या वेळेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना इतर पर्यायच स्वीकारावा लागणार आहे.

कोरोना-लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून 19.30 किलोमीटरचा मोनो मार्ग बंद आहे. आता राज्य सरकारने मेट्रो आणि मोनो सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आजपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनो वाहतूक सेवेत दाखल केली आहे. आज सकाळी सात वाजता वडाळ्यातून पहिली मोनो सुटली. यावेळी प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. कोरोनाच्या काळात प्रवासासाठी एक सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाल्याने प्रवासी खूश होते, तर पहिल्या दिवशी प्रवाशांची संख्या तशी कमी होती. रविवारचा दिवस असल्याने आणि आज पहिलाच दिवस असल्याने प्रतिसाद कमी आहे. असे असले तरी उद्यापासून प्रतिसाद वाढेल ,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आजपासून मोनोचा प्रवास करताना प्रवाशांना अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतील. मास्कशिवाय त्यांना मोनो स्थानकात प्रवेश मिळणार नाही. तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कागदी तिकीट बाद करत ई-तिकिटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टफोन असणाऱ्यांना मोनो प्रवास करणे शक्य होणार आहे. प्रवाशांना आरोग्य सेतू अ‌ॅप वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचवेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मोनोच्या फेऱ्या आधीच्या तुलनेत कमी करण्यात आल्या आहेत. सध्या मोनोच्या 30 फेऱ्या होणार आहेत. सकाळी 7 ते 11.15 पर्यत तर दुपारी 4.09 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत मोनो सेवा सुरू असणार आहे. म्हणजेच सकाळी 11.15 पासून दुपारी 4.09 पर्यंत मोनो बंद राहणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. पुढे परिस्थितीचा अंदाज घेत, प्रवाशांचा प्रतिसाद पाहता मोनोच्या फेऱ्या वाढवल्या जाण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details