महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हळूहळू सुधारतेय मोनिका मोरेची प्रकृती, हात प्रत्यारोपणाला आठवडा पूर्ण

मोनिका मोरेला आता खरेखुरे दोन्ही हात मिळाले आहेत. 26 ऑगस्टला चेन्नईमधील 32 वर्षीय ब्रेन डेड तरुणाचे हात मिळाले. हे हात त्याच रात्री चेन्नईवरुन चार्टर्ड विमानाने मुंबईत आणण्यात आले. एकाच वेळी दोन हातांच्या प्रत्यारोपणाची मुंबईतील ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. सध्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आणखी एक आठवडा तिला आयसीयूमध्ये ठेवले जाईल.

By

Published : Sep 4, 2020, 8:12 PM IST

हळूहळू सुधारतेय मोनिका मोरेची प्रकृती
हळूहळू सुधारतेय मोनिका मोरेची प्रकृती

मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल पकडताना पडून दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता खरेखुरे दोन्ही हात मिळाले आहेत. आठवड्याभरापूर्वी तिच्यावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. तर आता तिची प्रकृती सुधारत असून ती आता थोडेफार चालू लागली आहे अशी माहिती ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक, हैण्ड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. निलेश सातभाई यांनी दिली आहे. तिला आणखी आठ दिवस आयसीयूमधेच ठेवावे लागेल, असेही डॉ. सातभाई यांनी सांगितले आहे.

2014 मध्ये मोनिका लोकल पकडताना पडली आणि तिला दोन्ही हात गमवावे लागले. त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. पण कृत्रिम हातामुळे काही मर्यादा येत होत्या, कामे योग्य प्रकारे करता येत नव्हती. त्यामुळे तिच्यावर हात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 26 ऑगस्टला चेन्नईमधील 32 वर्षीय ब्रेन डेड तरुणाचे हात मिळाले. हे हात त्याच रात्री चेन्नईवरुन चार्टर्ड विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 वाजता 12 डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 15 तास ही शस्त्रक्रिया चालली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून आता मोनिकाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे.

एकाच वेळी दोन हातांच्या प्रत्यारोपणाची मुंबईतील ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. सध्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आणखी एक आठवडा तिला आयसीयूमध्ये ठेवले जाईल. आवश्यकतेनुसार तिला सर्व औषधोपचार दिले जात असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आहाराचेही ती योग्य पद्धतीने सेवन करतेय. याशिवाय आयसीयूमध्ये ती आधार घेऊन चालण्याचाही प्रयत्न करतेय. काही दिवसांनी हातांची क्रिया सुरळीत व्हावी, यासाठी तिला फिजिओथेरपी सुरू करण्यात येणार आहे, असे डॉ सातभाई यांनी सांगितले आहे. तर मोनिकाचे मामा विश्वास जाधव यांनीही मोनिकाची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details