मुंबई- दिल्लीत सत्ता मिळाली नाही म्हणून देशाच्या राजधानीचा चेहरा विकृत करण्याचे काम अमित शाह आणि मोदी यांनी केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केला. दिल्लीच्या दंगलीवर देशाचे गृह मंत्री अमित शाह यांनी एकही शब्द न काढणे ही क्रूरता आहे. आजपर्यंत दिल्लीतील दंगलीत ४२ लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे, शहा यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.
प्रतिक्रिया देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील सकाळच्या सत्रात अव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. आव्हाड यांनी मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. देशात एकीकडे आर्थिक घसरण थांबत नाही. बेरोजगारी वाढली असताना हे लोक आपले पाप लपवण्यासाठी जातीय दंगली घडवून आणत आहेत. २००२ मध्ये जे मॉडेल राबवले गेले तेच आता दिल्लीत राबवले जात असल्याचाही आरोप अव्हाड यांनी केला.
मोदी सरकारच्या एनपीआर आणि सीएएमुळे केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर देशातील सर्वात मागास हिंदू देखील अडचणीत येणार आहेत. त्यात राज्यात दोन कोटी भटके विमुक्त आहेत. त्यांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे, सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा सर्वाधिक त्रास हा गोर गरिबांना होणार आहे. मात्र यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे आव्हाड म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कार्यकर्ते हे उत्साहात काम करत आहेत. भाजप सारख्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम पवारांनी सुरू केले.
ज्याचे आयुष्य चाळीत गेले त्या माझ्यासारख्या नेत्याला आज पवार साहेबांनी गृहनिर्माण मंत्री केले आहे. एसआरए आणि म्हाडाचे सुयोग्य नियोजन करून गोरगरिबांना घरे मिळावीत म्हणून मला पवार साहेबांनी जबाबदारी दिली. त्यामुळे, नागरिकांच्या प्रश्नासाठी मी मुंबईत कुठेही यायला तयार असल्याचे आश्वासन आव्हाड यांनी दिले. जिथे गरज वाटेल तिथे मला हाताला धरून घेऊन जा. मी मुंबईच्या कानाकोपऱ्यात येण्यासाठी तयार आहे. मुंबईतील लोकांची सेवा करू या, असे आश्वासनही त्यांनी मुंबईचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांना दिले
हेही वाचा-'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मुंबईकडे आमचे दुर्लक्ष झाले'