मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये रोज ओला व सुका कचरा रहिवाशी टाकतात. कचरा पालिकेचे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये उचलून डम्पिंगपर्यंत पोहोचवतात. मात्र, कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, कामावरील साधने आणि स्वच्छतेकडे प्रशासनाकडून कायमच दुर्लक्ष होत असते, त्यामुळे हे कर्मचारी विविध व्याधींनी ग्रासलेले असतात. या कर्मचाऱ्यांना कामातील नैराश्य घालवण्यासाठी व कामाची आवड निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका व टाटा ट्रस्टने कुर्ला एल विभागात कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी एक नवीन चौकी साकिनाका जवळ उभी केली असून यात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पालिका हद्दीतील चौकीमध्ये स्वच्छता कर्मचारी सकाळी ६ वाजता कामावर जाण्यासाठी घरून येतात. मात्र, कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरोग्य व इतर सोयींकडे कायमच दुर्लक्ष असते. स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने असल्याने कपड्याची आदलाबदल असेल किंवा कामावरील साहित्याची सुरक्षा हे अपूर्णच असते. अशातच एक स्वच्छता कर्मचारी एकावेळी ६ ते ७ तास पदपथावरील धूळ, घाण कचरा एकत्र करीत जवळच्या कचरापेटीत टाकतो. कामाची वेळ संपल्यानंतर कर्मचारी चौकीमध्ये जाऊन विश्रांती घेण्यासाठी जातो. मात्र, विश्रांतीच्या ठिकाणीही अस्वच्छता असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.