मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलुंड-पूर्व मिठागर येथील पालिका शाळेतील क्वारंटाइन सेंटर मधील कोरोनाबाधित नागरिकांसाठी एक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनसेकडून वाचनासाठी 100 पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
मनसेने कोरोनाबाधितांसाठी सुरू केले वाचनालय;100 पुस्तके वाचनासाठी उपलब्ध - मनसे न्यूज
कोरोना संकटाच्या काळात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने मदत कार्य करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाबाधित नागरिकांसाठी क्वारंटाइन सेंटर मध्ये वाचनालय सुरू करण्यात आले.येथे विविध विषयांवरील शंभर पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मुलुंडमधील कोरोनाबाधित संख्येने 600 चा आकडा ओलांडला आहे. मिठागर येथील क्वारंटाइन सेंटर मधील कोरोनाबाधितांना थोडा विरंगुळा निर्माण व्हावा, या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुलुंड विभागाच्या माध्यमातून ही पुस्तक देण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील पुस्तके देखील याठिकाणी वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी तसेच उप विभाग संदिप कदम, सोनी निकम हे यावेळी उपस्थित होते.
मिठागर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असणाऱ्याचा वेळ जावा तसेच त्यांचा मनात काही वाईट विचार येवू नये यासाठी आम्ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतला. यावेळी आम्ही 100 पुस्तके वाटली आहेत. असे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांनी सांगितले.