मुंबई -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र विविध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. यातच होळी व धुळीवंदन हे सण दोन दिवसांवर आले असून या सणाच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक एकत्र येत असतात. त्यामुळे, कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून मुंबईमधील होळीचे सर्व कार्यक्रम रद्द करावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी मनसेचे वरळी विधानसभेचे विभाग अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र दिले आहे.
जीवघेण्या 'कोरोना'ने चीन-हाँगकाँगसह काही देशात धुमाकूळ घातल्यामुळे मुंबईतील विमानतळावर राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातूनही परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोना व्हायरसचे ३१ रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना व्हायरसने भीती निर्माण केली असताना होळी हा सण दोन दिवसांवर आला आहे. मुंबईत होळी व धुळीवंदनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात हजारो नागरिक सहभागी होत असतात. कोरोना व्हायरसच्या दहशतीचे सावट भारतात अनेक राज्यासह मुंबईतही पसरले आहे. त्यासाठी पालिकेने परिपत्रक काढून होळी धुळीवंदनाचे सर्व कार्यक्रम रद्द करावे अशी मागणी धुरी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.