मुंबई : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी दोन वेळा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आज तिथीनुसार शिवजयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना हे पक्ष तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. दादरच्या शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत ही शिवजयंती साजरी करण्यात आली.
काय म्हणाले राज ठाकरे : तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहित संबोधन केले आहे. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे आपले जीवितकार्य आहे व आपण ह्या ईश्वरी इच्छेचे वहनकर्ते आहोत ह्याची पुरेपूर जाणीव असणारे आपले महाराज, त्याकाळी इस्लामी राजवटींच्या आक्रमणात हिंदू राजवटी धडाधड कोसळत होत्या, एखाद दुसरी घटना सोडली तर शतकानुशतके अस्वस्थ हिंदू मनांना उभारी देईल अशी एकही घटना घडत नव्हती. बरे, इस्लामी राजवटी जिंकत होत्या, तो विजय हा काही त्या संस्कृती फार विकसित किंवा सुसज्ज होत्या म्हणून होत नव्हता, असेही राज ठाकरे म्हणाले.