मुंबई : या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि पिंपरी - चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही महाविकास आघाडीला करून दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा सल्ला महाविकास आघाडी मानणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीला पत्र : महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका पार पडत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला सुद्धा असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशा वेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली ठरणार नाही का? असे त्यांनी मत व्यक्त केले.