मुंबई -ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएम विरोधी सर्व पक्षांनी एकत्र यावे म्हणुन त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुद्धा भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) राज ठाकरे म्हणाले, ''भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुक जिंकून दाखवावी, मी स्वतः त्यांचे पुश्पगुच्छ देऊन अभिनंदन करेन'' मुंबईत आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
कलम ३७० वर बोलताना ते म्हणाले जम्मू काश्मीरचे दोन तुकडे केल्यानंतर महाराष्ट्रातून मुंबई आणि विदर्भाला पण तोडले जाईल. तसेच महाराष्ट्रातील मुख्य शहरांना आलेला महापूर, लोकसभा निवडणुका आणि जवळ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तसेच ईव्हीएमवर त्यांनी भाष्य केले. भाजप आणि शिवसेनेवर चौफेर टीका पाहायला मिळाली.
"३७० चे झाले, आता येतीलच मंदिर वही बनायेंगे म्हणायला. हे लोक फक्त राम भक्त म्हणून घेतात पण रामासारखे वागत नाहीत. रामायणातील किस्सा सांगताना ते म्हणाले, रामाने एका धोब्याच्या संशयावरून सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती. ईकडे देशात लाखो नागरिक ईव्हीएमवर संशय घेत आहेत तरी हे ऐकायला तयार नाहीत. हे कसले आले राम भक्त? अशा प्रकारे रामाचा दाखला देत राज यांनी ईव्हीएमवर भाष्य केले.