मुंबई MNS on Marathi Patya: राज्यभरात असलेल्या विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी फलक (Marathi Patya) लावावे या आग्रही मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आंदोलन करत आहे. मुंबई महानगरपालिकेला मनसेनं अल्टीमेटम दिला आहे. मुंबई महानगरपालिकेनंही सर्व दुकानदारांना याबाबत नोटिसा बजावून दोन महिन्यात सर्व पाट्या बदलाव्यात आणि मराठीत कराव्यात असे आदेश दिले होते. ही मुदत आज संपत आहे. त्यामुळं जर उद्या कुठे मुंबई महानगरपालिका हद्दीत किंवा राज्यात अन्य ठिकाणी मराठी फलक दुकानांवर अथवा आस्थापनांवर नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलमध्ये 'खळ्ळ-खट्याक' होणारच असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
कुर्ला चांदीवलीत आंदोलन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज चांदीवली परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. काही दुकानांवर अजूनही मराठी फलक नाहीत, याचा तीव्र निषेध करत आजचा दिवस शांततेत आंदोलन करण्यात आलं. उद्या मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेचे चांदीवली विभाग प्रमुख महेंद्र भानुषाली यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.