मुंबई : MNS Loksabha Election २०२४ :लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. सर्वच पक्ष त्या दृष्टीनं तयारी करत असून, आढावा बैठका सुरू आहेत. तर काही पक्ष आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांना कशी टक्कर देता येईल यासाठी आराखडा तयार करत आहेत. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray Loksabha २०२४) याकडं एक संधी म्हणून बघत आहे.
राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसोबत चर्चा :मनसे अध्यक्ष राज ठाकरे पूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी काही निरीक्षक देखील नेमण्यात आले होते. या निरीक्षकांनी जो अहवाल दिला, त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
पुणे, मावळवर असणार लक्ष : मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ आणि पुणे या दोन लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत. बारणे यावर्षी देखील याच मतदासंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी, भाजपा असे इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. अशातच पुण्यात दिवसेंदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद देखील वाढत आहे. त्यामुळं या दोन भागात आपला लोकसभेचा उमेदवार देण्यासाठी राज ठाकरे तयारी करत असल्याची माहिती आहे.