मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणामुळे सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडली आहे. विरोधकांकडून शिवसेनेला घेरण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही, असे असतानाच या प्रकरणावरून आता मनसेनेही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी सरकारला लगावला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे प्रकरण दिवसेंदिवस गाजत आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस सीआयूचे अधिकारी सचिन वाझेचे देखील नाव समोर आल्याने सर्वांना धक्का बसला. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आले. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही नाव वादात सापडले. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारकडून त्यांची बदली करण्यात आली होती. यावरूनच संदीप देशपांडे यांनी राजकारणात प्यादीच मरतात असा टोला लगावला आहे.