मुंबई- कोकणात होणारा नाणार प्रकल्पाला मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध करत स्थानिकांच्या भेटी-गाठी घेत लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती परिस्थिती वेगळी होती. आता राज्यावरच नाहीतर देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाले. लोकांकडे रोजगार उरलेला नाही. अशा परिस्थितीत नाणार सारखा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला तर राज्याला मोठे आर्थिक फटका बसणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे तयार होणारे रोजगार देखील इतर राज्यात जाऊ शकतात म्हणून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नाणार प्रकल्पासंदर्भात सामंजस्यची भूमिका घेत हा प्रकल्प राज्यात व्हावा यासाठी पत्र लिहिलेले आहे. याबद्दल अजून दुसरी कोणतीही भावना राज ठाकरे यांच्या मनात नाही, असे स्पष्टीकरण बाळा नांदगावकर यांनी दिले.
या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. येथील जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. पर्यावरणाचा, प्रदूषणाचा आणि निसर्गाचा समतोल साधून आपल्या लोकांना रोजगार कसा मिळेल उद्योग कसा मिळेल या सगळ्याची सांगड घालून हा प्रकल्प पाठिंबा देत आहोत, असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांची प्रकृती बिघडली; मुंबईच्या कोकिळाबेन रुगणालयात दाखल