मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एका बाजूला देशातील सर्व विरोधी पक्ष इंडिया या बॅनरखाली एकत्र आले असून, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या मित्र पक्षांना सोबत घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी दिसते. महाराष्ट्रात २०२४ च्या निवडणुकीत उपद्रवमूल्य अधिक असलेल्या पक्षांना अधिक मान मिळेल असं चित्र आहे. एका बाजूला महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला महायुती. त्यात शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट. या गट तटामध्ये महाराष्ट्राच्या जनतेत मोठा संभ्रम आहे. हा संभ्रमच अनेक पक्षांना संधी वाटत आहे. त्यादृष्टीने राज ठाकरेंची महाराष्ट्र् नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरलेली पाहायला मिळते.
अमित ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी : निवडणुकांच्या निमित्ताने मनसे पक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे अमित ठाकरे राज्याच्या विविध भागांचे दौरे करताना दिसतात. शुक्रवारीच मनसेच्या प्रमुख नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई गोवा हायवेच्या रखडलेल्या कामाविरोधात जागर पदयात्रा काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता अमित ठाकरेंकडे दुसरी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. ती जबाबदारी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ.
मनसे नेते अमित ठाकरे मैदानात :बारामती मतदारसंघातून सध्या शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. अशातच अजित पवारांनी आपली वेगळी चूल मांडल्याने पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघावर अनेकांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या नेत्यांनी बारामती मतदारसंघाला भेट दिली होती. यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा देखील समावेश होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असल्याचं भाजपाने जाहीर केलं होतं. आता इतके मोठे दिग्गज ज्या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रित करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, त्याच मैदानात मनसेने अमित ठाकरे यांना उतरवल्याची माहिती आहे.