मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील आरोग्यसेवा आणि डॉक्टर, कर्मचारी पगार कपात रद्द करावी, आदी मागण्या केल्या. टोपेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.
सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आणि इतर रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायलाच हवी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा, आदी प्रमुख मुद्द्यांवर अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.